चार्ली चॅप्लिन -जगाच्या इतिहासातील सर्वात कमनशिबी व्यक्ती.

चार्ली चॅप्लिन

स्वतःच्या मूक अभिनयाने सगळ्या जगाला हसवणारा हा अवलिया, व्यक्तिगत आयुष्यात मात्र एकाकी आणि दुःखी होता.

चार्लीचा जन्म १८८९ ला लंडनमध्ये झाला. वडिलांच्या दारूच्या व्यसनामुळे तीन वर्षांचा असतानाच आईवडील विभक्त झाले. त्यामुळं वडिलांचं प्रेम त्याला जास्त दिवस मिळालं नाही. चार्लीची आई गायिका होती. नकला आणि मनोरंजनाचे कार्यक्रम करून ती संसाराचा गाडा ओढत होती. मात्र कंठाशी निगडित असलेल्या एका आजारात तिचा आवाज पूर्णपणे बंद झाला. या सगळ्याचा ताण येऊन तिचे मानसिक संतुलन बिघडले. आईचा एकमेव आधारही गेला, त्यामुळं वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी छोट्या चार्लीला आश्रमात जाऊन राहावं लागलं. खेळण्या बागडण्याच्या वयात त्याला पोट भरण्यासाठी धडपड करावी लागत होती. शिक्षण अर्धवट सोडून तो छोटे मोठे नकलांचे कार्यक्रम आणि कॉमेडी शो करू लागला. त्याचे नाव कानावर येऊन अमेरिकेतील "फ्रेड कार्नो " कंपनीने त्याला बोलावून एका चित्रपटात मुख्य भूमिका दिली, त्यानंतर चार्लीने कधी मागे वळून बघितले नाही. स्वतःला इतर अभिनेत्यांपेक्षा वेगळे ठरवण्यासाठी त्याने विशिष्ट मूक अभिनय सुरू केला.

दरम्यान चार्ली एका पंधरा वर्षाच्या "हेट्टी केली " या नर्तिकेच्या प्रेमात पडला. अगदी बघताक्षणीच ती त्याला आवडली. तिच्यासाठी चार्ली अगदी वेडा झाला होता. त्याने तिला लग्नाची मागणीही घातली, पण तिने नकार दिला. १९४० मध्ये आलेल्या फ्लू महामारीमध्ये तिचा मृत्यू झाला. तिच्या अनपेक्षित मृत्यूमुळे चार्ली खचून गेला. त्यानंतर चार्लीचे चार विवाह झाले. पण यातही त्याला वादविवाद, भांडणं आणि घटस्फोटाचा सामना करावा लागला, ज्याचा परिणाम त्याच्या कारकीर्दीवर झाला. ऊना ओ'नील बरोबर त्याने चौथ्यांदा लग्न केले, जे शेवटपर्यंत टिकले. पण "पहिलं प्रेम" त्याच्या नशिबी आलं नाही.

चार्ली प्रसिद्धीच्या शिखरावर होता. १९२९ मध्ये "द सर्कस" या चित्रपटासाठी चार्लीला विशेष मानद पुरस्कार देण्यात आला. चार्ली अभिनेत्याबरोबरच संवाद लेखक, दिग्दर्शक आणि निर्माताही होता. त्याने राजकारणावर आधारित अनेक चित्रपट केले. "द ग्रेट डीक्टेटर" या चित्रपटात चार्लीने हिटलरची भूमिका केली, पण ही त्याच्या कारकिर्दीतली मोठी चूक ठरली. या चित्रपटामुळे त्याच्यावर कम्युनिस्ट असल्याचा आरोप करण्यात आला. चार्लीवर टीकेची झोड उठली. त्याच्या व्यक्तिगत आयुष्यावरही लोक चर्चा करू लागले. "द न्यूयॉर्क टाइम्स" या वृत्तपत्रात कमी वयातील मुलींशी लग्न केल्याने चार्लीची अवहेलना करण्यात आली. त्यानंतर सर्वच वृत्तपत्रांतून त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जाऊ लागले. घटस्फोट प्रक्रियेत मुलीचा पितृत्वाचा हक्क नाकारल्यामुळे त्याच्यावर टीकाही झाली. पण नंतर ती मुलगी चार्लीची नाही हे त्याच्या वकिलाने कोर्टात सिद्ध केले. या सगळ्या प्रकाराने व्यथित होऊन नाईलाजाने चार्लीला अमेरिका सोडावी लागली. स्विझरलँड मधील एका छोट्याशा खेड्यात तो कुटुंबासमवेत राहू लागला. ज्या ठिकाणी येऊन यशाचे शिखर गाठले तिथूनच बदनाम होऊन जावे लागले.

त्यानंतर दोनच महिन्यांत २५ डिसेंबर, १९७७ ला चार्ली चॅप्लिनचे निधन झाले. पण मृत्यूनंतर त्याच्या शरीराचीही हेळसांड झाली. दफनभूमीतून त्याचं मृत शरीर चोरीला गेलं. शव परत करण्यासाठी चोरांनी त्याच्या कुटुंबियांना ४००,००० $ ची खंडणी मागितली. कुटुंबीयांनी ही रक्कम देण्यास नकार दिला. पोलिसांच्या मदतीने अकरा आठवड्यानंतर एका छोट्याश्या झऱ्याजवळ त्याचं शव शोधण्यात यश आलं.

आपल्या मूक अभिनयातून सर्वांना खळखळून हसवणाऱ्या या अभिनेत्याला स्वतःच्या आयुष्यात मात्र लहानपणी ना आईवडिलांचं प्रेम मिळालं, ना तरुणपणात प्रेयसी मिळाली आणि मृत्यूनंतरही शरीराची विटंबना वाट्याला आली.

१९७२ साली चार्ली चॅप्लिन यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळी उपस्थित जनतेने बारा मिनिटे उभे राहून टाळ्या वाजवल्या. इतिहासातील ही सगळ्यात मोठी स्टँडिंग ओवेशन मानली जाते.

" मेरा दर्द किसी के हसने की वजह हो सकती हैं, लेकिन मेरी हसी किसीके दर्द की वजह नहीं होनी चाहीए " - चार्ली चॅप्लिन

Comments

Popular posts from this blog

मुलुख मैदान या तोफेचा युद्धामध्ये किती वेळा वापर करण्यात आला आहे?

आसफ़ जाही राजवंश

शके १६७६ मधील रहस्यम शिलालेख.